Thursday, February 8, 2024

 

मराठी सारस्वत आणि इस्माईल युसूफ महाविद्यालय

            इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच इ.स.१९३० सालापासून मराठी सारस्वताचा महाविद्यालयाशी घनिष्ठ अनुबंध राहिलेला आहे.अनेक प्रसिद्ध मराठी लेखक प्राध्यापक आणि विद्यार्थी या भूमिकेतून महाविद्यालयाशी निगडित होते.महाविद्यालयाच्या सुमारे ९० वर्षाच्या इतिहासात मराठी सारस्वतातील श्री.बा.रानडे, विमादी पटवर्धन, म.वा.धोंड, बा.सी.मर्ढेकर, पु.शि.रेगे,  के..पुरोहित(शांताराम), विजया राजाध्यक्ष हे प्राध्यापक म्हणून ,तर महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे हे विद्यार्थी म्हणून इस्माईल युसूफ महाविद्यालयाशी संबंधित होते.या लेखात या सृजनशील मराठी साहित्यिकांचा आणि त्यांनी सर्जन केलेल्या लेखनाचा परिचय करून देण्यात आला आहे.

श्री.बा.रानडे

            श्रीधर बाळकृष्ण रानडे हे मराठीतील नामवंत कवी महाविद्यालयात स्वातंत्र्यपूर्व काळात 'वनस्पतीशास्त्र' विषयाचे अध्यापन करत. इ. स. १९२३ या वर्षी स्थापन झालेल्या मराठी साहित्य इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या 'रविकिरण मंडळा'तील ते प्रमुख सदस्य आणि बिनीचे शिलेदार होते.श्री.बा.रानडे यांनी पाश्चात्य विज्ञान साहित्यावरून प्रेरणा घेऊन मराठीतील पहिली विज्ञान कथा इ. स.१९१५ साली लिहिली.श्री.बा.आणि त्यांची पत्नी मनोरमा या दोघांच्या कवितांचा  एकत्रित असा काव्यसंग्रह 'श्रीमनोरमा' या नावाने  प्रसिद्ध झाला.श्री.बा.रानडे यांच्या 'लेझिम चाले जोरात' ,'मृत्यूच्या दाढेतून' या कविता मराठी काव्यात उल्लेखनीय मानल्या जातात.

विमादी पटवर्धन

            वि. मा.दीक्षित पटवर्धन हे एक विनोदी लेखन करणारे मराठी साहित्यिक  इस्माईल  युसूफ महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.ते महाविद्यालयात 'ऑरगॅनिक केमिस्ट्री' (सेंद्रिय रसायनशास्त्र) शिकवित असत. प्रसिद्ध लेखक पी.जी. वुडहाऊस यांचा मानसपुत्र 'जीव्हज्' याला पटवर्धनांनी मराठीत 'जीवा' या नावाने अजरामर केले.'जीते रहो जीवा','जीवाची मर्दुमकी' ही अनुवादित ; 'हास्यकळ्या',' किती हसाल' ही बालसाहित्यपर ;'रत्ना' ही कादंबरी आणि 'साहित्य गुदाम' हे विनोदी अशी अनेक पुस्तके विमादी पटवर्धनांनी लिहिली.

म. वा.धोंड 

            मधुकर वासुदेव धोंड हे मराठीतील समीक्षक इस्माईल युसूफ महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करीत.'ऐसा विटेवर देव कोठे','तरीही येतो वास फुलांना','काव्याची भूषणे', ‘चंद्र चवथीचा','जाळ्यातील चंद्र','मऱ्हाठी लावणी' या समीक्षात्मक ग्रंथांचे लेखन म. वा.धोंड यांनी केले.त्यांनी लिहिलेल्या ' ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी ' या समीक्षा ग्रंथाला इ. स.१९९७ या वर्षीचा ' साहित्य अकादमी पुरस्कार' लाभला.

बा.सी. मर्ढेकर

            बाळ सीताराम मर्ढेकर हे प्रसिद्ध मराठी कवी,लेखक आणि समीक्षक स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इस्माईल युसूफ महाविद्यालयात काही काळ इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांना 'मराठी नवकाव्याचे प्रवर्तक' मानले जातात. मर्ढेकर हे भाषाप्रभू असून त्यांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.'शिशिरगम','काही कविता' हे   काव्यसंग्रह;'रात्रीचा दिवस','तांबडी माती','पाणी' या कादंबऱ्या संज्ञाप्रवाही कादंबऱ्या;'सौंदर्य आणि साहित्य','कला आणि मानव' हे समीक्षाग्रंथ अशी मर्ढेकरांची साहित्यसंपदा आहे. इ. स.१९५६ साली बा. सी.मर्ढेकरांना 'सौंदर्य आणि साहित्य' या सौंदर्यशास्त्रावरील समीक्षा ग्रंथासाठी मानाचा  साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

पु.शि.रेगे

            पुरुषोत्तम शिवराम रेगे हे मराठी सारस्वतातील कवी,नाटककार इस्माईल युसूफ महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच प्राचार्य होते.पु.शि.रेगे यांनी मराठीत उत्कट प्रेमकविता, सौंदर्यलक्ष्यी संस्कृतप्रचूर काव्य लेखन केले.त्यांच्या कवितेमध्ये स्त्रीशक्ती वेगवेगळ्या स्वप्नील रूपांमध्ये प्रगट होते.पु.शि.रेगे यांचे ‘फुलोरा’, ‘दोला’, ‘गंधरेषा’, ‘पुष्कळा’ इ. काव्यसंग्रह;’सावित्री’,’रेणू’, ‘मातृका’ या दर्जेदार कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.पु.शि.रेगे हे इ. स.१९६९ या वर्षी वर्धा येथे भरलेल्या ' अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते."जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे." अशी पु.शि.रेगे यांची श्रद्धा आणि धारणा होती.

 

शांताराम

            केशव जगन्नाथ पुरोहित उपाख्य ‘शांताराम’ हे मराठीतील नवकथाकार इस्माईल युसूफ महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच प्राचार्य होते. ’अंधारवाट’, ’आठवणींचा पार’, ’उद्विग्न सरोवर’, ’काय गाववाले’, ’चंद्र माझा सखा’, ’चेटूक’, ’छळ आणि इतर गोष्टी’, ‘जमिनीवरची माणसं’, ’ठेवणीतल्या चीजा’, ’धर्म’, ’मनमोर’, ’रेलाँ रेलाँ’,’लाटा’, ’शांताराम कथा’, ’शिरवा’, ’संत्र्यांचा बाग’, ‘संध्याराग’,सावळाच रंग तुझा’, ‘हेल्गेलंडचे चाचे’अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. शांताराम यांनी अमरावती येथे इ. स.१९८९ या वर्षी भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां'चे अध्यक्षपद भूषविले.

शंकर वैद्य 

            शंकर वैद्य हे मराठीतील नामवंत कवी आणि गीतकार इस्माईल युसूफ महाविद्यालयात अनेक वर्ष मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते.कुशल वक्ते,सूत्रसंचालक,काव्यसमीक्षक म्हणूनही वैद्य सरांची ख्याती होती. ‘कालस्वर’ आणि ‘दर्शन’ हे दोन काव्यसंग्रह तसेच 'आला क्षण गेला क्षण' हा कथासंग्रह वैद्य सरांनी लिहिला."स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ", "पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई", " शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला" अशा अनेक अजरामर शब्दरचनांनी काव्यरसिकांवर कविवर्य शंकर वैद्य यांनी गारूड केले.

विजया राजाध्यक्ष

            विजया राजाध्यक्ष या मराठी साहित्यातील नामवंत स्त्रीवादी लेखिका आणि समीक्षिका इस्माईल युसूफ महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापिका होत्या. विजयाबाईंना 'मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि  संदर्भ' या समीक्षाग्रंथासाठी साहित्य अकादमी (इ.स.१९९३) तर मराठी साहित्यातील समग्र योगदानासाठी 'जनस्थान पुरस्कार'(२०१७) प्राप्त झाला. इ. स.२००० मध्ये इंदूर येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या विजयाबाई अध्यक्ष होत्या.साहित्य संमेलनाच्या इतिहासात अध्यक्षपद भूषविणाऱ्या विजयाबाई या चौथ्या स्त्री लेखिका आहेत.

 

पु.ल.देशपांडे

            पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे मराठीतील लोकप्रिय लेखक इस्माईल युसूफ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. लेखक,नाटककार, नट,कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीतकार अशा अनेक भूमिका पुलंनी पार पाडल्या. महाराष्ट्राचे अष्टपैलू आणि लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पुल यांची ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘बटाट्याची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’,’असा मी असामी’ यांसारखी शेकडो पुस्तके प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे यांचा पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, पुण्यभूषण ,साहित्य अकादमी,संगीत नाटक अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

            अशा अनेक ज्ञात अज्ञात मराठी सारस्वतातील रत्नांचा सहवास लाभला असल्याने इस्माईल युसूफ महाविद्यालय पावन झाले आहे.

प्रा. समीर रामचंद्र वैरागी

 विभागप्रमुख (मराठी)

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, November 2, 2023


 मराठी अभिमान गीत 

 


         


        
मराठी भाषेची प्रशस्ति

 जैसी हरळामाजी रत्नकिळा।

            कीं रत्नामाजी हिरा निळा।

            तैसी भाषांमाजी चोखळा।

            भाषा मराठी।।१।।

 

            जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी।

            कीं परिमळांमाजि कस्तुरी।

            तैसी भाषांमाजी साजिरी।

            मराठियां।।२।।

 

            पखियांमधें मयोरु।

            रुखियांमधे कल्पतरु।

            भाषांमधें मानु थोरू।

            मराठियेसी।।३।।

 

            तारांमधे बारा राशी।

            सप्तवारांमाजी रवि-शशी।

            या दीपिचेयी भाषांमधे तैसी।

            बोली मराठीया।।४।।

 

                                        - ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स




मराठी विभागाचा YOUTUBE चॅनल 
चॅनल लिंक : UCyT6LuODubRLreIR2DEDzjQ

Saturday, October 21, 2023

 

 

                                                                मराठी भाषा गौरव दिन 

 


इस्माईल युसूफ महाविद्यालय : एक विहंगावलोकन